*धाराशिवमध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याला सुरुवात*
पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी जनजागृतीवर भर
धाराशिव (सा
संत गोरोबाकाका समाचार वृत्तसेवा)
राज्यातील नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे,पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटवून देणे आणि शाश्वत जलव्यवस्थापनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविणे या उद्देशाने जलसंपदा विभागातर्फे १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५’ साजरा करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील या उपक्रमाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी श्री.किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते सिंचन भवन, आनंदनगर येथे करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष तसेच अधीक्षक अभियंता श्री.विजय थोरात यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या वेळी जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी अध्यक्षीय भाषणात पाण्याच्या सुयोग्य वापराविषयी समाजात जनजागृती वाढवण्याचे आवाहन केले.त्यांनी दुष्काळी भागांतील शेतकऱ्यांनी जलतारासारख्या उपक्रमांची अंमलबजावणी करून भुजल पातळी वाढविण्यासाठी सहकार्य करण्यात यावे,असे आवाहन केले.
डॉ.मैनाक घोष यांनी ही मोहीम सर्व घटकांसाठी खुली असून,नागरिक, संस्था आणि यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष श्री.नानासाहेब पाटील आणि प्रा.डॉ.नितीन पाटील (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर,धाराशिव) यांनीही मार्गदर्शन केले.
अधीक्षक अभियंता श्री.विजय थोरात यांनी विभागाच्या लोकाभिमुख धोरणांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शेतकरी,पाणी वापर संस्था, विद्यापीठे व सेवाभावी संस्थांशी संवाद,कालवा स्वच्छता अभियान, भूसंपादन व पुनर्वसन अडचणी निराकरण,पाणीपट्टी आकारणी व वसुली,जललेखा परीक्षण, 7/12 नोंदीकरण आणि अतिक्रमण निष्कासन अशा विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाची सांगता कृष्णा मराठवाडा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.अमोल नाईक यांच्या समारोपीय भाषणाने झाली.त्यांनी जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष कृतीसह सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांचे आभार मानले.
*******