गाळ काढण्याच्या कामासह, पाणंद रस्ते, शेतरस्ते मिशन मोडवर पूर्ण करा
'मित्र'चे उपाध्यक्षआमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारमाही वहिवाटीसाठी शेतरस्ते आणि पाणंद रस्ते उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी जलसाठ्यातील गाळ काढून अस्तित्वातील पाणीसाठ्यात वाढ करण्याच्या दृष्टीनेही युद्ध पातळीवर प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी ही सगळी कामे १५ एप्रिल पासून सर्व यंत्रणांनी नागरिकांचा सक्रिय सहभाग घेत मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश 'मित्र' चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महसूल,कृषी आणि ग्रामविकास खात्यासह जिल्हाप्रशासनाला दिले आहेत.
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह धाराशिव, तुळजापूर आणि कळंबचे तहसीलदार व गटविकास अधिकारी या महसूल आणि ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने ही कामे हाती घेण्याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. ही कामे सुरू असतानाच पहिल्या टप्प्यात धाराशिव, तुळजापूर व कळंब तालुक्यातील रस्ते निश्चित करण्यात आले आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर सर्व तालुक्यातही अशीच प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ज्या रस्त्यावरील सर्व शेतकऱ्यांच्या संमती मिळतील व माती कामाकरिता मशीनरीसाठी आवश्यक इंधनापुरता लोकवाटा जमा होईल, त्या ठिकाणी तातडीने कामे सुरू करण्यात येतील. सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींच्या माध्यमातूनही माती कामासाठी मशिनरी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर शेतकऱ्यांनी इंधनापुरता लोकवाटा जमा करावयचा आहे. त्यानंतर रस्त्याचे मजबुतीकरण शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नमूद केले आहे.
जिल्ह्यात पाझर तलाव, साठवण तलाव, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, लघु व मध्य प्रकल्प असे १२०० हुन अधिक जलसाठे अस्तित्वात आहेत. या सर्व प्रकल्पात आजघडीला साचलेला गाळ काढल्यास जलसाठ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे शेतीसाठी मोठया प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकते. जलसाठ्यातील गाळ काढण्यासाठी ४२ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध झाला आहे. त्याव्यतिरिक्त सीएसआर निधीच्या माध्यमातूनही आवश्यकतेनुसार आणखीन निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.या विषयावर आपलं गेल्या एक महिन्यापासून काम सुरू असून दर १५ दिवसाला याचा आढावा घेण्यात येणार आहे.त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावात काम करण्याच्या सूचना आपण जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत. आपापल्या गावात आणि परिसरात तातडीने ही सगळी प्रक्रिया राबवून घेण्यासाठी त्या-त्या भागातील शेतकरी बांधवांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.