>

वैद्यकीय महाविद्यालयात सहा पोलिसांचे पथक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निर्देश : पोलीस प्रशासनाची कार्यवाही


 वैद्यकीय महाविद्यालयात सहा पोलिसांचे पथक

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निर्देश : पोलीस प्रशासनाची कार्यवाही

धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आणि तातडीने तज्ञांच्या निगराणीखाली उपचार उपलब्ध व्हावे यासाठी आपण मोठा पाठपुरावा करून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. मात्र त्याठिकाणी रुग्णांना दिलासा देण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी बांधवांना काही समाजकंटक वेठीस धरत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात तातडीने पोलिसांचे पथक तैनात करून आरोग्य कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आपण दिल्या होत्या. त्यानुसार आता सहा पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले असून याउपरही कोणाला जाणीवपूर्वक त्रास दिला गेल्यास आपल्या निदर्शनास आणून द्यावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.



समाजकंटकाकडून त्रास होत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसराला ८ मार्च रोजी भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक यांना जर कोणी नाहक त्रास देत असेल तर आपण हे कदापि सहन करणार नाही अशा शब्दात त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांना सुनावले होते. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात उपद्रव माजविणाऱ्या समाजकंटकांचा तात्काळ कायदेशीर मार्गाने बंदोबस्त व्हायलाच हवा आशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देत समाजकंटकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे पोलीस प्रशासनाला निर्देश दिले होते.


 रुग्णालय परिसर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपद्रव माजविणाऱ्या या समाजकंटकांवर तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर पोलीस प्रशासन आता कामाला लागले आहे. आपण दिलेल्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. स्वप्नील राठोड यांनी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक, रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव या समाजकंटकांकडून होऊ नये म्हणून सहा पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक तैनात केले आहे. तसेच दिवस व रात्री च्या गस्ती पथकांच्या फेऱ्या देखील सुरू केल्या आहेत.रात्री-अपरात्री होणाऱ्या त्रासाला यामुळे आता नक्की आळा बसेल. पोलिसांचे पथक तैनात केल्यानंतरही या उपद्रवी समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक पुन्हा त्रास सुरू झाल्यास अजिबात न घाबरता आपल्या निदर्शनास आणून द्यावे असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. दिल्या. तसेच पोलीस प्रशासनानेही सर्वसामान्य नागरिक आणि कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन होणार नाही याची गांभीर्याने काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले आहे. या कामात कुचराई झाल्यास आपण कदापि सहन करणार नाही अशी तंबीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे

Post a Comment

Previous Post Next Post