आर.पी.औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
धाराशिव-(सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेव)
डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल, गडपाटी धाराशिव येथील आर. पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि धाराशिव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत नैसर्गिक, रासायनिक, जैविक, किरणोत्सारी तसेच मानवनिर्मित आपत्तींसंदर्भात सखोल मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घेण्यात आली.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या विविध आपत्ती आणि त्यावरील उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांना संक्षिप्त माहिती दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या प्रमुख अधिकारी श्रीमती वैशाली तेलोरे यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दलाचे प्रमुख अधिकारी श्री. पंकज चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या महत्त्वपूर्ण तत्त्वांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी भोपाळ गॅस दुर्घटना आणि वैझाग येथे घडलेल्या वायू दुर्घटनेचे उदाहरण देत अशा आपत्ती कशा टाळता येऊ शकतात, यावर प्रकाश टाकला. तसेच, आपत्तीजनक परिस्थितीत वेळेप्रसंगी घेतली जाणारी त्वरित कृती, मनुष्यहानी टाळण्यासाठीच्या उपाययोजना आणि प्रत्यक्ष बचाव कार्याची प्रात्यक्षिके करून दाखवली.
विद्यार्थ्यांनी कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. राम लोमटे, प्रा. मुजकिर पठाण आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.