>

*शेतकऱ्यांना सिंचन आणि नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठ्याची हमी : पालकमंत्री प्रतापराव सरनाईक










*शेतकऱ्यांना सिंचन आणि नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठ्याची हमी*
       पालकमंत्री प्रतापराव सरनाईक

*निम्न तेरणा व सीना-कोळेगाव प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक*

धाराशिव,
 (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा )
 शेतकऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच नागरी पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल याची दक्षता घ्यावी.यासोबतच पाणीपट्टीची वसुली वेळेत करण्यासाठी संबंधित विभागाने जबाबदारीने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिले.

आज (१० फेब्रुवारी) पालकमंत्री श्री. सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली निम्न तेरणा प्रकल्प कालवा आणि सीना-कोळेगाव प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली.पालकमंत्री श्री.सरनाईक दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.या बैठकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास पाटील-घाडगे यांनी देखील ऑनलाईन सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण लातूरच्या अधीक्षक अभियंता तथा प्रशासक रुपाली ठोंबरे,धाराशिवचे अधीक्षक अभियंता श्री.थोरात, कार्यकारी अभियंता ए.एन.पाटील, सीना-कोळेगाव व निम्न तेरणा प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती के.व्ही.कालेकर, तसेच धाराशिव पाटबंधारे मंडळाचे सहायक अधीक्षक अभियंता सी.आर.पाटील आणि निम्न तेरणा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एन.बी. पाटील उपस्थित होते.





पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी सांगितले की,सिना-कोळेगाव प्रकल्पाअंतर्गत भोत्रा कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात नियमित पाणी सोडले गेले पाहिजे.त्यामुळे ३५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होईल.जलाशयातील उपलब्ध पाणीसाठा हा केवळ सिंचन आणि पिण्यासाठी राखीव असावा व त्याचा योग्य वापर व्हावा,असे ते म्हणाले.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उन्हाळी हंगामाच्या तयारीसाठी पाणीसाठा योग्य पद्धतीने राखला जावा आणि पिण्याच्या तसेच सिंचनासाठी नियोजनपूर्वक वापरला जावा याकडे लक्ष वेधले.उजनी प्रकल्पातून आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे तसेच भोत्रा बंधाऱ्यात नियमित पाणी सोडण्यास कायमस्वरूपी मान्यता द्यावी,असेही त्यांनी सुचविले.

जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी सांगितले की,उन्हाळ्यात नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आवश्यक पाणी मिळण्यासाठी उपलब्ध साठ्याचे योग्य नियोजन करण्यात येईल.

श्रीमती ठोंबरे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून निम्न तेरणा आणि सीना-कोळेगाव प्रकल्पातील सिंचन व्यवस्थेची माहिती दिली.त्यांनी सांगितले की,निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून ४,८६२ हेक्टर आणि डाव्या कालव्यातून ६,७४८ हेक्टर,असे एकूण ११,६१० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे.लोहारा तालुक्यात ४४५ हेक्टर (डावा कालवा) आणि १,५८३ हेक्टर (उजवा कालवा),तर उमरगा तालुक्यात ७७९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते असे त्या म्हणाल्या.

                 ******


 

Post a Comment

Previous Post Next Post