नितीन काळे यांच्याकडून अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
धाराशिव तालुक्यातील विविध गावात वादळी वाऱ्यांसह आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भारतीय जनता पार्टीचे मा. जिल्हाध्यक्ष श्री. नितीन काळे यांनी भेट देऊन पाहणी केली सदर नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून द्यावी अशा सूचना यावेळी श्री. नितीन काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या वादळी वाऱ्यांमुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले. जनावरांच्या गोठ्यांसह पत्रांचे शेड उखडले. झाडे पडून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. विजेचे खांब पडून तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. या अवकाळीचा फटका शेतकरी, मजूर, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे, परंतु नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. कारण राज्यातील महायुतीचे सरकार आहे हे सरकार सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून काम करत आहे. नुकसानग्रस्त भागातील सर्व नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह आपण स्वतः प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी श्री. नितीन काळे यांनी दिली.
यावेळी नुकसानग्रस्त भागांतील नागरिक, शेतकरी, व्यापारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.