जनतेची सहानुभूती मिळवणाऱ्या खासदारांनी पाच वर्षातली पाच कामे सांगावीत : युवा नेते मल्हार पाटील
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
लोकसभेच्या तिसऱ्या टप्यात मतदान होत असलेल्या धारशिव लोकसभा मतदारसंघात आता प्रचार तापला असून वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह यांना गार करून आलोय तू कीस झाडं कि पत्ती असे डॉ. तानाजी सावंत यांना विद्यमान खासदाराने म्हटले आहे. या वाक्याचा खरपूस समाचार घेत महायुतीचे युवा नेते मल्हार पाटील यांनी बघू त्यांना किती जमतय असे म्हणत सडेतोड उत्तर दिले आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री आणि धारशिवाचे पालकमंत्री यांच्या टीका करताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाटील कुटुंबीयांना राजकारणातून तडीपार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले होते या टीकेला उत्तर देताना मल्हार पाटील म्हणाले, ज्या माणसाने उभा कारखाना विकून हजारो कामगारांचं नुकसान केलं, एका व्यक्तीने तर त्यांचं नाव लिहून आत्महत्या केली, की यांच्यामुळे आमचा रोजगार गेला त्यांनी आमच्यावर आरोप करणे हे हास्यास्पद आहे.
आमच्या मायबाप जनतेची नाळ आमच्याशी जुळलेली आहे. त्यांच्या आशीर्वादाने पिढ्यान पिढ्या आमच्या सोबत राहिलेल्या आहेत. मी असो किंवा आमचे कुटुंबीय असो हे अतिशय नम्रपणे सांगतो की, जनतेच्या प्रेमामुळेच आम्ही राजकारणात आणि समाजकारणात आजपर्यंत कार्यरत आहोत आणि पुढे पण आमचे कार्य सुरूच राहिल यात शंका नाही. पाटील कुटुंबीयांनी जनतेची खूप सेवा केली आहे आणि पुढे पण करत राहणार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा आपल्या धाराशिव मध्ये आणायची आहे हा संकल्प घेऊनच आम्ही मोदीजींच्या पाठीशी उभे राहिला आहोत.
पुढे बोलताना मल्हार पाटील म्हणाले, धाराशिव मधील जनता ही निवडणूक भावनेच्या भरात घेणार नाही. आज जनतेची सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी मागील पाच वर्षात कोणती पाच कामे केली? हे सांगितलेलं नाही. येथील जनतेच्या नरेंद्रभाई मोदी यांच्यावर प्रचंड विश्वास असून त्यांना येत्या सात तारखेला ही जनता साथ देईल असा आम्हाला विश्वास आहे.