महायुतीच्या अर्चनाताई पाटील यांचे १९ ला शक्तिप्रदर्शन
उमेदवारी दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची उपस्थिती
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील शुक्रवार, १९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार असून उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहे. अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी महायुतीने अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्या शुक्रवार, १९ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक, धारासूर मर्दिनी मंदिर, हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी रहे. दर्गाह, काळा मारूती मंदिर येथे अर्चनाताई पाटील दर्शन घेणार आहेत.सकाळी ९ वाजता राजमाता जिजाऊ चौक येथून त्यांच्या शक्तिप्रदर्शनास प्रारंभ होणार आहे. त्यांच्या शक्तीप्रदर्शनाची रॅली आर्य समाज चौक, संत गाडगेबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असणार आहे. अभिवादन व देवी-देवतांचे आशीर्वाद घेवून संत गाडगेबाबा चौकातून उमेदवार अर्चना पाटील सहभागी होणार आहेत.
या रॅलीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री शिवसेना नेते डॉ. तानाजीराव सावंत, मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री आ.संभाजीराव निलंगेकर, आमदार ज्ञानराज चौगुले, औशाचे आमदार अभिमन्यू पवार, बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, प्रा.रवींद्र गायकवाड, सुरेश बिराजदार, सुरेश पाटील, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, किरण गायकवाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, मोहन पणुरे, पीपल्स रिपाइंचे ऍड मल्हारी बनसोडे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.