महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा जंबो दौरा
३०० गावांना भेटी देण्याचा संकल्प पहिल्या टप्प्यात ४० गावे पूर्ण
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र प्रदेश सरचिटणीस
डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी चंग बांधला असून त्यांनी भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघासह कळंब व धाराशिव या विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना भेटी देत संवाद साधला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे निवडून येणे कसे आवश्यक आहे हे ते व्यक्तिगत गाठीभेटी घेऊन सांगत आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास ४० पेक्षा अधिक गावांना भेटी दिल्या असून ते ३०० पेक्षा जास्त गावांना भेटी देण्याचे त्यांनी नियोजन आखले आहे. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची नसून आपली स्वतःची आहे अशा पद्धतीने त्यांनी सध्या प्रचार सुरू केला आहे.हा प्रचार सार्वजनिक सभा असा नसून ज्या ज्या गावात त्यांना मानणारा वर्ग आहे किंवा कार्यकर्ते,परिचित व्यक्ती, कुटुंब आहेत अशा ठिकाणी ते स्वतः जाऊन त्या कुटुंबांच्या भेटी घेत आहेत. यासोबतच रस्त्यावरील व शेतातील सर्वसामान्य लोकांच्या देखील गाठीभेटी घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना विजयी करण्याचे आवाहन ते या दौऱ्या दरम्यान करताना दिसून येत आहेत. कुठलाही लवाजमा न ठेवता व्यक्तिगत भेटीवर त्यांनी भर दिला आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार ओम राजे निंबाळकर यांच्यानंतर सध्यातरी महाविकास आघाडीकडून डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.