मागे सासरेला निवडून दिले होते आता सुनेला निवडून द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
राज्यात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे अर्ज दाखल झाले आहे. देशाच्या नेत्याच्या निवडीच्या या प्रक्रियेत स्थानिक मुद्द्यांनाही तेवढेच महत्व आहे. केंद्र सरकारकडून आपल्या भागाच्या विकासाला मदत हवी असेल तर देशात जे वारे वाजत आहे त्या मोदी विचारांचाच खासदार निवडून द्या असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिवकरांना अर्चना पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
अजित पवार म्हणाले,देशामध्ये मोदी साहेबांचं तिसऱ्यांदा सरकार येणार आहे. आपण मागे उजनीच पाणी आणलं होतं, पण ते आपल्यासाठी पुरेसे नाहीये, आता आपल्याला कृष्णा भीमा स्थिरीकरणाचे पाणी आवश्यक आहे. या राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी आठ वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. परंतु आपल्याला राज्य सरकारचा निधी कमी पडणार आहे त्यामुळे केंद्रातून निधी येणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या विचाराचा खासदार हा आपल्या भागातून लोकसभेत गेला पाहिजे.
अर्चना राणा पाटील ह्या महायुतीचा उमेदवार असून केंद्रातील सरकारच्या विचाराच्या उमेदवार आहेत मागच्या वेळेस आपण डॉ. पद्मसिंह पाटलांना निवडून दिलं होतं. मागे सासऱ्यांना निवडून दिलं होतं आता सुनेला निवडून द्या चार दिवस सासूचे असतात आता सुनेचे दिवस आलेले आहेत. आपली घरची सून आहे. मागे मोदी सरकारने लोकसभेत आणि विधानसभेत वन थर्ड जागा या महिलांना दिलेले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत आपल्या महिला ज्या चुलमुल आणि घर बघून राहत होत्या त्या आता देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे ही किमया नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे.
धाराशिवच्या दुष्काळग्रस्त भागात आपल्याला पाणी आणायचा आहे आणि यासाठी अर्चनाताईंना आपल्याला लोकसभेत पाठवायचा आहे. पाण्याच्या प्रश्नाबरोबरच रेल्वेचा प्रश्न,नॅशनल हायवेचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न आणि उद्योगाला पोषक असं वातावरण आपल्याला इथं तयार करायचा आहे असेही पवार म्हणाले.