मुंबईला वैद्यकीय महाविद्यालय नेल्याचे पुरावे द्या मी राजकारण सोडतो : आमदार राणाजगजीतसिंह पाटील
राणा दादा विरोधकावर संतापले
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
तेरणा ट्रस्टचे वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवऐवजी मुंबईला नेले, असे जनतेला खोटे बोलून मतासाठी धडपड करणारा विरोधी उमेदवार खोटारडा आहे. त्यांच्या खोटेपणाला सीमा नाही. वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला मंजूर झाले आणि ते मुंबईला नेल्याचा पुरावा जनतेसमोर सादर करावा, आपण राजकारण सोडून देऊ, अशा शब्दात भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विरोधी उमेदवाराला आव्हान दिले आहे.
तेरणा ट्रस्टचे नेरूळ येथील वैद्यकीय महाविद्यालय 1991 साली सुरू झाले. तेंव्हापासून आपल्या परिसरातील नागरिकांवर ट्रस्टमार्फत मोफत उपचार केले जात आहेत. जुलै 2012 पासून महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू झाली. तेंव्हापासून आजवर साधारणपणे एक लाख रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. शासनाच्या योजनेस यातील 27 हजार रूग्ण पात्र ठरले आहेत. त्याव्यतिरिक्त 73 हजार रूग्णांवर तेरणा ट्रस्टने 48 कोटी रूपयांचे उपचार स्वतःच्या खर्चाने केले आहेत. विरोधक पातळी सोडून खोटारडेपणा करीत आहेत. आता त्यांना जसेच्या तसे उत्तर दिले जाईल. शस्त्रक्रिया आणि उपचार यातील फरक ज्या बाळाला कळत नाही, त्यावर आपण बोलावे, एवढी त्याची लायकीही नाही. वेळ आल्यास सोलापूर येथील स्वदेशी-परदेशी प्रकरण जगजाहीर करावे लागेल, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला.
धाराशिव येथे गतवर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. या महाविद्यालयाच्या जागेच्या विषयातही विरोधकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जनतेच्या सोयीसाठी तसेच जागेच्या कमतरतेमुळे हे वैद्यकीय महाविद्यालय सध्याच्या शासकीय औद्योगिक केंद्राच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य व केंद्र सरकार निधी कमी पडू देणार नाही, याची ग्वाही सरकारने दिलेली आहे. मात्र जनतेची दिशाभूल करून मतासाठी मतदारांना खोटे बोल, पण रेटून बोल या म्हणीप्रमाणे विरोधक जनतेला खोटे बोलत सुटले आहेत. आपल्या खासदारकीच्या काळात जनतेच्या हितासाठी केलेली दोन कामे त्यांनी सांगावीत, इतकेही काम कोणाला दिसून येत नाही. स्वतः काहीही न करता दुसर्यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्यात नेहमी अग्रेसर असणारे विरोधक अजूनही फोनच्या बाता मारत सुटले आहेत. त्यांनी दुसर्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याऐवजी स्वतः जनतेच्या कल्याणासाठी केलेल्या दोन कामांची यादी जनतेसमोर ठेवावी, असा टोलाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांना लगावला. यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, अॅड. खंडेराव चौरे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.