हाती मशाल घेऊन निघालय पण आपण काय बोलतोय त्याचं भान नाही-मा.खा. रविंद्र गायकवाडांनी निंबाळकरांचा घेतला चांगलाच समाचार
धाराशिव :(सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) धाराशिव लोकसभा मतदारसंघात दोन्ही बाजूने आता जोरदार टिका टिप्पणी सुरू झाली आहे. यातच आमच्या रक्तांमध्ये राष्ट्रवादी, हृदयामध्ये भाजप आणि आमच्या हातामध्ये धनुष्यबाण असल्याचे विधान अर्चना पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी केलं होतं. त्यावर आता किडनीमध्ये शिंदे गट टाका, लिव्हरमध्ये मनसे टाका, शरीराच्या सर्व पार्टमध्ये सगळे पक्ष गेले की रात्रीतुन कोणत्याही पक्षात जायला मोकळे असा पलटवार ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. त्यातच राम मंदिर झाल्यास नोकरी मिळणार का? असा सवालही त्यांनी केला होता. त्यावर आता महायुतीच्या नेत्यांकडून ओमराजे निंबाळकर यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी ओमराजे निंबाळकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीचा विद्यमान खासदार हातात मशाल घेवून निघाला आहे. मात्र, त्याला त्याच्या पदाचे आणि आपण काय बोलतोय?, याचं भान नाही. अन् त्या मशालीत तेल ओतायचं काम पवार साहेब करीत आहेत. किती पेटेल यांची गॅरंटी नाही, अन् पेटली तर वरून एक बाण गेला तर ती मशाल कधी विझेल हे सांगता येत नाही. असं म्हणत "..अरे तुला माहित आहे का प्रभू श्रीराम म्हणजे काय? रामाचे चारित्र्य काय? रामाचे विचार काय? गल्लीबोळातील पोरासारखं हा लोकसभेचा उमेदवार बोलतोय.." अशी टीका माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली.
पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, शिवसेना आणि भाजपचा कार्यकर्ता रामशीला घेवून गावोगावी फिरला आहे. राम हे आमचे आराध्य दैवत आहे. राम मंदिराचे महत्व काय हे फक्त आम्हाला माहिती आहे. ते आमच श्रद्धास्थान आहे. यावरच हा देश तरणार आहे. राम मंदिर व्हावे ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हायस्ट लीड या विधानसभा मतदार संघातून बसवराज पाटील, मी, आ.ज्ञानराज चौगुले, सुरेशदाजी बिराजदार आणि येथील प्रत्येक कार्यकर्ता मिळवून देईल. येथे आपल्याला शंभर टक्के यश मिळणार आहे. त्यामुळे राणा पाटील तुम्हाला काळजी करायची गरज नाही, अशा शब्दांत रविंद्र गायकवाड यांनी विजय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.