तेरचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पायाभरणी – आ. राणाजगजितसिंह पाटील
तेर (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
आधुनिक भारतामध्ये तेरची वेगळी ओळख निर्माण करत गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वंकश विकास आराखडा तयार करण्यात आला असून प्राचीन वारसा स्थळांना नवीन झळाळी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जागतिक स्तरावर तेरचे नाव पोहोचविण्यासाठी नियोजन बध्द काम सुरू असून येथे वैभव, समृध्दी, रोजगार यावा व येथील वैभवशाली इतिहास जगासमोर मांडता यावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी संतश्रेष्ठ श्री गोरोबाकाका मंदीर व परिसरातील विकास कामांच्या भूमीपूजन प्रसंगी बोलताना केले.
तेर ता. धाराशिव येथील मंदिर परिसरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तुळजापूरचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शनिवार दिनांक ९ रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यासह प्रयत्नांतून तेर ता. धाराशिव येथील श्री संत गोरोबाकाकांच्या मंदिर व परिसराच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद व पर्यटन विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सब स्टेशन ते गोरोबाकाका मंदिर रस्त्याचे रुंदीकरण करणे ९ कोटी रुपये, संत गोरोबाकाका तीर्थक्षेत्र परिसर सुधारणा यामध्ये प्रवेशद्वार, लाकडी मंडप व इतर कामांसाठी ६ कोटी ८५ लाख रुपये, भक्तनिवास उर्वरित बांधकाम करणे २ कोटी १५ लाख रुपये, पुरातत्व विभागाकडून गोरोबाकाका मंदिर परिसर जन सुविधा केंद्राचे बांधकाम करणे १ कोटी १७ लाख रुपये, तर जिल्हापरिषदेच्या माध्यमातून संत गोरोबाकाका परिसर विकास संरक्षण भिंत पेव्हर ब्लॉक व पाण्याची सोय करणे आदी बाबींसाठी १ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यासह तीर्थकुंड, त्रिविक्रम मंदिर, चैत्यगृह, कोट टेकडी या स्मारकांच्या जतन व संवर्धनासाठी जवळपास रु. २३ कोटी असे एकूण रु ४३ कोटीहून अधिकचा निधी देण्यात आला आहे.
यावेळी बोलताना आ. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, डॉ. साहेबांनी केलेल्या अभूतपूर्व कामांमुळे जिल्ह्याच्या विकासात मोठी भर पडली आहे. ठाकरे सरकारच्या काळात रखडलेले कालवा दुरुस्तीचे काम, रेल्वेसाठी राज्य सरकारचा वाटा, टेक्निकल टेक्टस्टाइल पार्क यासारखे विषय महायुतीच्या काळात वेगाने मार्गी लागले. कोल्हापूर, सांगलीच्या पुरात वाहून जाणारे पाणी जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शाश्वत पाणी, उद्योग व धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून उन्नती साधण्यासाठी आपण काम करत असून धाराशिव, तुळजापूर, तेर झपाट्याने बदलतयं याची प्रचिती आपल्या सर्वांना येत आहे.
याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, पद्माकर फंड, शिवाजीराव नाईकवाडी, निहाल काझी, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, हभप शिवाजी महाराज रोगे, भास्कर माळी, जुनेद मोमीन, अजीत कदम, प्रविण साळुंखे, नवनाथ पसारे, संजय लोमटे, किशोर काळे, प्रतिक नाईकवाडी, रविराज चौगुले, अभिजीत बैरागी, गणेश फंड, अभिजात सराफ, सोमनाथ फासे, सतीश कदम, अर्शद मुलाणी आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.