>

धाराशिवमधील रस्त्यांसाठी १५४ कोटी रुपये मंजूर : आ. राणाजगजितसिंह पाटील












धाराशिवमधील रस्त्यांसाठी १५४ कोटी मंजूर

खड्डे आणि धुळीच्या संकटातून शहरवासीयांची होणार मुक्ती

आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

खड्डे आणि धुळीच्या साम्राज्यामुळे त्रस्त झालेल्या धाराशिव शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शहरातील २५ किलोमीटर लांबीच्या सिमेंट रस्त्यांसाठी १५४ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सिमेंट रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम यातून केले जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५४ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव, कळंब, तुळजापूर, नळदुर्ग या शहरांतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. वाढीव वस्त्यांमधील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने रस्ते व नाली विकासासाठी प्रारूप आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना एप्रील २०२३ मध्ये देण्यात आल्या होत्या. याबाबत धाराशिव आणि कळंब येथे पत्रकार परिषद घेवून नागरिकांना माहिती दिली असल्याचे आमदार पाटील यांनी नमुद केले.

धाराशिव शहरातील रस्ते व नाली बांधकामासाठी १५४ कोटींचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. तुळजापूरसाठी १७३ तर नळदुर्ग शहराकरिता १०४ कोटींचा आराखडा देण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात तुळजापूरसाठी १३९ कोटी तर नळदुर्गसाठी ९७ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती. धाराशिव शहराचा विषय प्रलंबित राहिला होता. आता या प्रलंबित प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. धाराशिव शहरातील  २५किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध व्हावा, याकरिता आपण सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

जानेवारी २०२४ मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून निधीची मागणी केली. त्यांच्या विशेष सहकार्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवसाठी १५४ कोटी रूपये मंजूर केले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे खराब रस्ते, खड्डे आणि धुळीच्या त्रासापासून नागरिकांना आता दिलासा मिळाला असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

  

Post a Comment

Previous Post Next Post