स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करणारे छत्रपती शिवाजी महाराज पहिले राजे-डॉ.वेदप्रकाश पाटील
डॉ.व्ही.पी कॅम्पसमध्ये शिवजयंती निमित्त व्याख्यान
धाराशिव (स. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा )
स्वराज्य निर्माण करणे हे जसे छत्रपती शिवाजी महाराज यांनी धाडसाचे काम केले त्याच पद्धतीने स्वराज्याचे रूपांतर सुराज्यामध्ये करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे होते असे प्रतिपादन परभणी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.वेदप्रकाश पाटील यांनी डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील डॉ.व्हि.पी कॅम्पस गडपाटी आळणी येथे शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर कैलास शर्मा,आर.पी.कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.गाझी शेख,भैरवनाथ बी.व डी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरज ननवरे,एस. पी.पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अमर कवडे, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलास मोटे,प्र.प्राचार्य ऋषीकेश लोमटे व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य क्रांतीकुमार पाटील यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.वेदप्रकाश पाटील म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात बेरोजगारी,कर्जबाजारी,उपाशी राहणा-यांची व आत्महत्या करणाऱ्यांची संख्या नव्हती त्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने स्वराज्यच निर्माण केलं नाही तर ते सुराज्य देखील होत. आजच्या पिढीने शिवजयंती केवळ नाचून नाही तर वाचून साजरी करावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.त्यासोबतच छत्रपती शिवाजीराजे हे युद्ध व व्यवस्थापन शास्त्रात देखील इतरांपेक्षा शंभर वर्षे पुढे होते त्यामुळेच युरोपीय लोकांपेक्षा आपले आरमार देखील मोठे असावे अशी राजांची इच्छा होती आणि त्यांनी ते करून दाखवलं. छत्रपतींकडे तेरा देशातील लोक नोकरीला होते आणि त्यांनी आपलं अष्टप्रधान मंडळ बनवत असताना कोणतीही वशिलाबाजी न करता सर्व जाती धर्मांना त्यामध्ये स्थान दिलेलं होतं. त्यामुळे समानता जपणारा राजा म्हणून छत्रपतींची ओळख आहे. तुमचा आमचा देव ही रयतच आहे हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पूर्ण राज्यकारभार केला. त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांचा देखील मोठा वाटा असल्याचेही डॉ.पाटील यांनी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.पी.कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.गाझी शेख यांनी केले व आभार प्रा.राम लोमटे यांनी मानले तर सूत्रसंचालन शिवानी येडे व मधूलक्ष्मी थोरात यांनी केले. एजाज अहमद यांनी कार्यक्रमाचे छायाचित्रन करण्याचे कार्य केले. या कार्यक्रमास डॉ.व्हि.के.पाटील शैक्षणिक संकुलातील सर्व अध्यापक वर्ग,विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.