>

असे घडले पळसप मराठवाडा साहित्य संमेलन




 असे रंगले पळसप येथे 9 वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन

स्व. शिक्षक आमदार वसंतरावजी काळे साहेब यांच्या 17 व्या पुण्यतिथीनिमित्त पळसप ता. जि. धाराशिव येथे 9 वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन दि. 02 फेब्रुवारी 2024 रोजी अतिशय उत्साहात पार पडले.

या साहित्य संमेलनाची सुरुवात सकाळी ठिक 8.00 वा. ग्रंथदिंडीने करण्यात आली. या ग्रंथदिंडीत किसान शिक्षण प्रसारक मंडळ, बोरगाव (काळे) या संस्थेतील शाळा, महाविद्यालय यांनी सहभाग घेतला याचबरोबर पळसप पंचक्रोशीतील विविध शाळा, महाविद्यालयांनी सहभाग घेतला. या ग्रंथदिंडीत विविध देखावे सादर करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने महापुरुषांचे देखावे, वारकरी  देखावे, झांज पथक, लेझिम पथक, देशभक्तीपर देखावे, पारंपरिक वेशभूषा-वासुदेव, गोंधळी इ. नेत्रदिपक देखावे सादर करण्यात आले. या ग्रंथदिंडीचे महत्वाचे आकर्षण म्हणजे मराठवाडाभर ज्याची ख्याती आहे असे लातूर येथील ‘सामना’ ढोल ताशा पथक. या ढोल पथकात रममाण होऊन संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा.आ. विक्रमजी काळे साहेब यांनी झांज वाजवून सहभाग घेतला तसेच या पथकाला ऊर्जा देण्याचे काम केले. ग्रंथदिंडीचे पूजन मा. प्रा. डॉ. संजय कोरेकर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साहित्य संमेलनाध्यक्षा मा. अंजली धानोरकर, प्राचार्य डॉ. काळम पाटील, प्राचार्या शुभांगीताई काळे, प्राचार्य अनिल काळे, प्राचार्य मधुकरराव गायकवाड, प्रा. अंकुश नाडे, तसेच संमेलनाच्या माजी अध्यक्षा मा. ललिता गादगे याही उपस्थित होत्या. ही ग्रंथदिंडी पळसप गावातील सर्व मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आली. यावेळी ग्रंथदिंडीच्या स्वागताला दुतर्फा ग्रामस्थ उभे होते तसेच प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून परिसर आनंदमय निर्माण केला होता. या ग्रंथदिंडीत जवळपास 2000 मुलां-मुलींनी सहभाग नोंदविला होता. या ग्रंथदिंडीने पळसप नगरीला तसेच रसिकांना, साहित्यप्रेमींना मंत्रमुगध करुन टाकले होते. ‘डोळ्याचे पारणे फिटणे’ याची अनुभूती या ग्रंथदिंडीतून आली.

ग्रंथदिंडीनंतर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मा. प्राचार्य डॉ. अशोक नाईकवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठवाड्याच्या विविध भागातील प्रकाशन तसेच ग्रंथ विक्रेते यांनी आपली दुकाने थाटली होती. या ग्रंथप्रदर्शनात बालासाहित्यापासून ते कथा, कादंबरी, नाटके, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, तसेच अनेक दर्जेदार समिक्षा ग्रंथाची रेलचेल होती. या ग्रंथ प्रदर्शनास रसिकांनी, वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या ग्रंथप्रदर्शनात ग्रंथविक्रेत्यांना कोणतेही मूल्य आकारले गेले नव्हते. हे एक या ग्रंथप्रदर्शनाचे वेगळे वैशिष्ट्ये होते उलट स्वागताध्यक्षांनी यांच्या निवासाची व भोजनाची सोय मोफत केली होती. पुस्तक विक्रेत्यांनी ‘पळसपचे संमेलन हे एक घरचे संमेलन’ आहे त्यामुळे आम्ही आवर्जुन दरवेळी येतो अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली.

ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन याबरोबर उत्कृष्ठ चित्रप्रदर्शनाचे आयोजन ही करण्यात आले होते. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चित्रकार मा. प्रकाश घादगिने तसेच मंगेश निपाणीकर यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता ख्यातकिर्त पत्रकार मा. धनंजय रणदिवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी समेलनाध्यक्षा मा. अंजली धानोरकर उद्घाटक मा. निशीगंधा वाड, विशेष अतिथी मा. ना. संजयजी बनसोडे, माजी मंत्री मा. महादेवजी जानकर, प्राचार्या शुभांगीताई काळे, प्राचार्य अनिल काळे, कुलगुरु मधुकरराव गायकवाड, प्रा. अंकुश नाडे उपस्थित होते.

यानंतर सकाळी 11 वाजता भव्य अशा सभामंडपात संमेलनाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठाची उभारणी अतिशय देखण्या पद्धतीने करण्यात आली होती. निटनिटकेपणा व टापटिपणा हे या सभामंडपाचे खास वैशिष्टये होते. या सभामंडपाच्या व्यासपीठासमोर अतिशय सुंदर अशी श्रीराम-लक्ष्मण व भरत या भावडांची तसेच श्रीराम मंदिराची सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती. संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्षा मा. अजंली धानोरकर, उद्घाटिका डॉ. निशिगंधा वाड, मंत्री मा. ना. संजय बनसोडे, माजी मंत्री मा.आ. महादेव जानकर यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी व्यासपीठावर मा. प्रा. संजय कोरेकर, प्राचार्य डॉ. अशोक नाईकवाडे, मा. पत्रकार धनंजय रणदिवे, सौ. उषाताई कदम, प्राचार्य शुभांगीताई काळे, सौ. अनुराधाताई काळे, प्राचार्य मधुकरराव गायकवाड, प्राचार्य अनिल काळे, प्राचार्य डॉ. काळम पाटील यांची उपस्थिती होती. या व्यासपीठावरील सर्वात महत्वाचे व्यक्तीमत्व म्हणजे स्व. वसंतरावजी काळे साहेब यांच्या धर्मपत्नी तसेच आम्हा सर्वांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई वसंतराव काळे ह्या होत्या. त्यांच्या शुभाशिर्वादामुळेच काळे परिवाराचा नावलौकिक आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांकडून ऐकण्यात आली.

साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना संमेलनाच्या उद्घाटिका डॉ. निशिगंधा वाड म्हणाल्या की, अशी साहित्य संमेलने ग्रामीण भागात आयोजित करणे हे फार मोठे जिकीरीचे काम आहे, मराठी साहित्याच्या प्रांतात ग्रामीण साहित्याला फार मोलाचे स्थान आहे. माती, शिवार, ग्रामीण समाज, रुढी, प्रथा, परंपरा याचे दर्शन ग्रामीण साहित्यातून घडते. शेती व शेतीशी निगडीत सर्व व्यवहार ग्रामीण साहित्यात येतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी टिकला तरच देश टिकेल? असा आशावाद ही त्यांनी यावेळी बोलून दाखविला – यावेळी मा.ना. संजय बानसोडे यांनी साहित्य संमेलन व भाऊंची पुण्यतिथी यातील साम्य व्यक्त केले. वसंतराव काळे साहेबांची साहित्यिक दृष्टी यावेळी त्यांनी अनेक उदहरणावरून रसिकांसमोर मांडली व स्वागताध्यक्ष मा. विक्रमजी काळे साहेब यांना आयोजनाबद्दल शुभेच्छा देत देत आपणही लकरच या राज्याचे कॅबिनेट मंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या – हाच धागा पकडून माजी मंत्री महादेव जानकर यांनीही मंत्रीपद मिळवण्यासाठीच्या कल्पृत्या यावेळी सांगितल्या. श्री. विक्रम काळे एक अभ्यासू, संयमी नेतृत्व असून ते मंत्रीपदाचे दावेदार व हक्कदार आहे आणि लवकरच मंत्री होतील अशा शुभेच्छा दिल्या.

संमेलनाध्यक्षा मा. अंजली धानोरकर म्हणाल्या की, साहित्य संमेलनाचे आयोजन ही काळाची गरज आहे. साहित्य संमेलनामधून मूल्यांची पेरणी केली जाते. एक सुसंस्कृत समाज निर्माण होण्यास मोठा हातभार लागतो. आज मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचनातून माणूस सुसंस्कृत होतो. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरात कांही किमान पुस्तके खरेदी करावीत व ठेवावीत. पुस्तक वाचनाने काय फायदा होतो? असा बालबोध प्रश्न काही लोक विचारतात त्यांना मला असं म्हणायचे आहे की, पुस्तक वाचले की लगेच फायदा कदाचित नाही होणार पण आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्याचे बळ साहित्य मात्र निश्चित देईल. साहित्याशिवाय माणसाला शाहाणा व सुसंस्कृत बनवणारा दुसरा कोणताही मार्ग नाही असे ते म्हणाल्या – संमेलनाच्या उद्घाटन सत्रात रसिकांना खूप साहित्यिक मेजवाणी मिळाली याच सारे श्रेय संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. आ. विक्रजी काळे साहेब यांना द्यावे लागेल अश प्रतिक्रिया मान्यवर, साहित्यिक, रसिक यांच्याकडून ऐकावयास मिळाल्या. यावेळी उपस्थित सर्वांना सुरुची भोजनाची सोय स्वागताध्यक्ष यांच्याकडून विनामूल्य / प्रवेश शुल्काशिवाय करण्यात आली होती. यावेळी प्रास्ताविकात संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा.आ. विक्रमजी काळे साहेब यांनी संमेलनाच्या आयोजनापाठीमागची भूमिका सविस्तरपणे विशद केली.

साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभामध्ये अमेरिकेत राहणाऱ्या परंतु मुळ तावरजखेडा ता.जि. धाराशिव येथील कु. स्वराली प्रदिप फेरे इ. 9 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनी लिहलेल्या ‘दि सीक्रेट अनटोल्ड’  या कादंबरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वसंतराव काळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास फेरे यांच्या ‘आमदार सौभाग्यवती : आस्वाद व आकलन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच डॉ. भागवत राऊत यांच्या ‘होय, तंबाखुमुक्ती व्यसन शक्य आहे’ या पुस्तकाचेही प्रकाशन व्यासपीठावरील संमेलनाध्यक्षा, उद्घाटक, मान्यवर, स्वागताध्यक्ष यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मान्यवरांनी या लेखकांना पुढील वाटचालीस व लेखनास मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.

भोजनावकाशानंतर ‘कृषी व कृषीपुरक व्यवसाय – काळाची गरज’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मा.आ. बाबासाहेब पाटील हे होते तर सहभागामध्ये कुलगुरु डॉ. अशोक ढवण, प्रा.डॉ. विजय भामरे तसेच प्रयोगशील शेतकरी मा. श्री. रामेश्वर मांडगे यांची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांनी शेती व शेतकरी यांच्या व्यथाचे दर्शन घडविले. शेतकऱ्यांना राजा म्हणून संबोधले असले तरी त्याची आजची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली आहे. महागाईने त्याचे कंबरडे मोडले आहे तर दुसरीकडे शेतीमालाला भाव मिळत नसल्याची खंत बोलून दाखविली. अनेक सरकारे आली व गेली परंतू शेतकऱ्याच्या जीवनात कांहीही परिवर्तन घडून आले नाही. कृषी व्यवस्थेचा कणा मजबूत झाल्याशिवाय राष्ट्र मजबूत होवू शकत नाही अशी भावना या परिसंवादातील सर्व अभ्यासक, मान्यवर यांच्या भाषणातून व्यक्त झाली. शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा टाकणे गरजेचे आहे तसेच कृषीपूरक व्यवसाय उभारणे काळाची गरज आहे. असे झाले तरच शेतकरी या व्यवस्थेमध्ये टिकू शकेल अशी भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली.

‘कथाकथन’ हे साहित्य संमेलनाचे मुख्य आकर्षण – कथा सांगणे व कथा ऐकणे ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे. प्राचीन काळापासून कथा सांगणाऱ्या कथाकाराला समाजात मानाचे स्थान असे. कथा सांगण्याचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असत. कथेचा मुख्य उद्देश लोकांचे मनोरंजन करणे हा असला तरी कांही मूल्यांची रुजवणूक करणे हा ही कथा निवेदनाच्या पाठीमागचा मुख्य उद्देश होता. अशाच हेतू समोर ठेवून समन्वय समितीने व स्वागताध्यक्ष यांनी कथाकथनाचे आयोजन केले होते. कथाकथनाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध कथाकार मा. गेणू शिंदे हे होते. तर सहभागी कथाकार म्हणून नांदेड येथील मा. श्री. राम तरटे तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील मराठी विषयाचे प्रा. डॉ. वैजनाथ अनमूलवाड हे उपस्थित होते. राम तरटे यांनी ‘बारा आण्याची बोंब’ ही कथा सांगून श्रोत्यांना हसवले व चिंतन करावयास भाग पाडले. अल्लड वयातील प्रेमाचे मनोविश्व उलगडून दाखविण्याचा त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला आहे. प्रियसीला रंग लावण्यासाठी पैसे मिळावेत म्हणून प्रियकर कोणकोणऱ्या गोष्टी करतो व त्यातून त्याची कशी फसगत होत जाते याच सुंदर व बोली भाषेत कथन खूप छान पद्धतीने केले आहे. रसिकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. 

दुसरे कथाकार वैजनाथ अनमुलवाड यांनी ‘हिकमत’ ही कथा खास शैलीत सादर केली. शेतकऱ्याचे दयनीय जीवन त्यांनी आपल्या कथेतून व्यक्त केले. हिकमत धरल्याशिवाय व शेती क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केल्याशिवाय पर्याय नाही अशी भावना शेतकरी, सालगडी यांनी ठेवल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती होवू शकणार नाही अशा आशयाचा भाव आपल्या कथेतून व्यक्त केला. यावेळी गेणू शिंदे यांनीही आपली कथा दिमाखदार व अस्सल ग्रामीण भाषेत कथन करुन श्रोत्यांना खिळवून ठेवले.

यानंतर कविसंमेलन या सत्राचे अध्यक्ष नांदेड येथील सुप्रसिद्ध कवि  प्रा. महेश मोरे हे होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कविता ही कमी शब्दात अधिक आशय व्यक्त करते. आपल्या मनातील भाव-भावना अभिव्यक्त करण्याचे ते एक महत्वाचे साधन आहे. या कविसंमेलनात प्रेमकविता, शेतकऱ्यांच्या व्यथा, महिलांचे प्रश्न बेकारी, दारिद्रय, अंधश्रद्धा, शासकीय ध्येयधोरणे यासंबंधी अनेक कविंनी आपले मते कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली. अनेक कवितांना वन्समोअर मिळाला. या कविसंमेलनातून रसिक मंत्रमुग्ध झाले. नविन कवींना प्रेरणा मिळाली. या कविसंमेलनामध्ये एकूण 36 कवींनी आपल्या कविता सादर केल्या. या कविसंमेलनाचे अतिशय बहारदार सुत्रसंचलन छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध कवि श्री. मनोज खुटे यांनी केले. त्यांनी आपल्या सुत्रसंचलनातून रसिकांना मंत्रमुग्ध करित करित शेरास शव्वाशेर अशा कविता सादर केल्या. कविसंमेलनाने साहित्य संमेलनात खूप मोठी रंगत निर्माण केली.

साहित्य संमेलनातील सर्वात आवडता व अधिक रसिकांची गर्दी खेचणारा कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम या कार्यक्रमास पळसपच्या पंचक्रोशीतून अनेक स्त्री-पुरुष रसिक महिला सहभाग नोंदवतात. या सांस्कृतिक कार्यक्रमात किसान परिवारातील शाळा, महाविद्यालये तसे परिसरातील शाळा, महाविद्यालये आपल्या गुणवान कलाकारासह कला सादर करण्यासाठी उपस्थित राहतात. या सांस्कृतिक कलाप्रकारात, गणेशवंदना, शेतकरी नृत्य, लावणी, रिमिक्स गीते, देशभक्तीपर गीते, विविध लोककला प्रकाराचं सादरीकरण अतिशय सुंदर रितीने केले जाते.  या सांस्कृतिक कलाप्रकारात कु. सृष्टी जगताप हिने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कसे केले? त्याची पार्श्वभूमी कथन केली तसेच नृत्य व पोवाडा कलाप्रकार याप्रसंगी सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मध्यान्योत्तर झाली तरी रसिकांचा प्रचंड प्रतिसाद होता. यामधील अनेक गितांना वन्समोअर मिळाला. देश-विदेशात आपली कला सादर करणारा वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकी चा विद्यार्थी गणेश देशमुख यांनी लावणी सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. या गुणी कलाकाराचा संमेलनाध्यक्ष मा.आ. विक्रमजी काळे साहेब यांनी रोख पारितोषिक, शाल, स्मृतीचिन्ह देवून गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक कार्यक्रमातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयातील सहभागी कलाकारांचा शाल, स्मृतीचिन्ह व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. तसेच प्रत्येक कलाकारास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व ग्रामीण भागातील कलाकार देशपातळीपर्यंत पोहचला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा टाकत असल्याची भावनाही स्वागताध्यक्ष मा.आ. विक्रमजी काळे यांनी यावेळी बोलून दाखविली.

पळसप सारख्या ग्रामीण भागात स्व. शिक्षक आमदार वसंतरावजी काळे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्ता व त्यांच्या विचारसरणीला  अभिप्रेत असा उपक्रम विद्यमान आ. विक्रम वसंतराव काळे साहेब सतत आयोजित करतात ही फार मोठी मोलाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया रसिक, श्रोते, नातलग, मित्रपरिवार, कार्यकर्ते, साहित्यप्रेमी व नागरिक यांच्याकडून ऐकावयास मिळाली. वडिलांची पुण्यतिथी अशा आगळया-वेगळया पद्धतीने साजरी करणारे हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत अशी प्रतिक्रिया साहित्य संमेलनाच्या उद्घाटन, परिसंवाद, कथाकथन सहभागातील सर्व मान्यवरांनी व्यक्त केली. साहित्य संमेलनातील सर्व उपस्थितांनी सुरुची भोजनाची मोफत सोय करण्यात आली होती हे एक या संमेलनाचे वेगळे वैशिष्टये होते. 

या साहित्य संमेलनाचा समारोप समारंभात संमेलनाध्यक्षा मा. अंजली धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जेष्ठ साहित्यिक प्रा. शेषराव मोहिते, मा. आ. कैलास पाटील, मा. आ. सतीष चव्हाण व स्वागताध्यक्ष मा.आ. विक्रमजी काळे यांच्या उपस्थित संपन्न्‍ झाले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली. मनोगत व्यक्त करताना अशी साहित्य संमेलने नवोदित साहित्यिकांना साहित्य लेखनास बळ देतील तसेच असे साहित्य संमेलन दरवर्षी आयोजित करावे व ग्रामीण प्रश्न नवोदित साहित्यिकांनी आपल्या लेखनीतून प्रखरपणे मांडावेत अशी अपेक्षाही यावेळी मा. शेषराव मोहिते तसेच मा.आ. कैलास पाटील यांनी आपल्या भाषनातून व्यक्त केली.

9 वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन हे मराठी साहित्य विश्वात आपले वेगळेपण सिद्ध करणारे साहित्य आहे. ही साहित्य संमेलन आयोजनाची परंपरा सातत्याने चालू राहील अशी भावना या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मराठवाडा विभगाचे शिक्षक आमदार मा. विक्रमजी काळे साहेब यांनी बोलून दाखविली.

असे रगंले…… दि. 2 फेब्रुवारी 2024 रोजी पळसप येथील शिक्षणमहर्षी वसंतराव काळे साहित्य नगरीमध्ये 9 वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन…….


शब्दांकन –

प्राचार्य डॉ. हरिदास फेरे,

वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकी,

ता.जि. धाराशिव

भ्रमणध्वनी - 9423440592



Post a Comment

Previous Post Next Post