मराठा समाजाचे आरक्षण न्यायालय टिकावे यासाठी सरकारने आतापासूनच प्रयत्न करावेत -डॉ.प्रतापसिंह पाटील
मनोज जरांगे पाटील यांच्या खंबीर लढाईला यश
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा )-
एक सामान्य माणूस काय करू शकतो हे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाहून सर्वांनाच आता लक्षात आले असेल. एका सामान्य माणसाने जर एखादी गोष्ट मनावर घेतली आणि त्याला समाजाचा तन-मन-धनाने पाठिंबा मिळाला तर काहीही घडू शकतं हेच आजच्या या सरकारच्या शासन निर्णयावरून लक्षात आल आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
पुढे त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की,मराठा समाजाला आज या मिळालेल्या आरक्षणाबद्दल मी प्रथम शुभेच्छा देतो. मात्र यामध्ये काही गोष्टी या संशयास्पद व क्लिष्ट वाटत आहेत त्यामुळे भविष्यात याला आव्हान देण्यासाठी काही लोक आतापासूनच तयारी करत आहेत.16 फेब्रुवारी पर्यंत हा शासन निर्णय आहे त्यानंतर याच्यावरती अंतिम निर्णय होणार आहे तोपर्यंत सरकारने ज्या हरकत येतील त्या हरकतीवर योग्य तो तोडगा काढून मराठ्यांना कायमस्वरूपी आरक्षण कसे मिळेल यासंदर्भात प्रयत्न करणे गरजेचे आहे अन्यथा यापूर्वी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं मात्र ते आरक्षण न्यायालयात टिकलं नव्हतं त्यामुळे हे आरक्षण 16 फेब्रुवारी च्या नंतर मिळाले का? याचे उत्तर मिळणार आहे. मराठा आरक्षणाच्या या लढाईत उजळून निघालं ते नेतृत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचे. त्यांनी जीवाची परवा न करता अनेक दिवस उपोषण केलं व समाजाला आरक्षण दिल्याशिवाय घरी जाणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा देखील केली व ती पाळली. त्यामुळे त्यांचे खरं तर मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना या लढ्यामध्ये ज्या ज्ञात-अज्ञात लोकांनी सहकार्य केले त्यांचे देखील मराठा समाजाच्या वतीने मी आभार मानतो.