>

टेक्निकल टेक्सटाईल पार्क रू १११ कोटीचा विकास आराखडा तयार :आ. राणाजगजीतसिंह पाटील












टेक्निकल टेक्स्टाईल पार्क - रू. १११ कोटीचा विकास आराखडा तयार

- आ. राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

कौडगाव येथे राज्यातील पहिला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क एमआयडीसीच्या माध्यमातून उभारण्यात येत असून या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता रुपये १११.४० कोटीचा प्रस्ताव तयार झाला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

कौडगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. ३ मध्ये ९०.२० हेक्टर क्षेत्रावर टेक्निकल टेक्सटाईल पार्क प्रस्तावित करण्यात आलेला आहे. मुख्य अभियंता एमआयडीसी यांच्याकडून या पार्कच्या पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सुमारे १०००० रोजगार निर्मिती क्षमता असलेला हा प्रकल्प असून या औद्योगिक क्षेत्रात रस्ते, पुल, पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन, विद्युतीकरण व वृक्षारोपण या कामांकरिता रुपये १११.४० कोटी अंदाजपत्रकीय किमतीच्या कामांचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

         धाराशिव शहरासाठी उजनी धरणातून आणलेल्या पाण्यामधून २ एमएलडी पाणी एमआयडीसीसाठी आरक्षित आहे. यासाठी रुपये ४.५ कोटी एमआयडीसी कडून नगरपरिषद धाराशिव कडे जमा करण्यात आले होते. या औद्योगिक क्षेत्रात जवळून जाणाऱ्या बार्शी - धाराशिव रस्त्यालगत या योजनेची पाईपलाईन असून येथूनच गॅस पाईपलाईन देखील जात आहे.

दळणवळणासाठी आवश्यक सुविधा येथे उपलब्ध असून आता पायाभूत सुविधा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या क्षेत्रात आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास अनेक उद्योजक येथे आकर्षित होतील, त्यामुळे ही कामे लवकरात लवकर मंजूर करून घेण्याचा प्रयत्न आहे. तांत्रिक वस्त्र निर्मितीला मोठा वाव असून या क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून मुंबई येथे आयोजित केलेल्या तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रदर्शनामध्ये एमआयडीसी ने लावलेल्या दालनाला अनेक उद्योजकांनी भेट दिली होती व येथे उद्योग सुरू करण्यास उत्सुकता दर्शविली होती. त्यामुळे पायाभूत सुविधा पूर्ण होताच उद्योजकांकडून येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल  असा विश्वास आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.


 

Post a Comment

Previous Post Next Post