व्वा रे सरकार
३१ डिसेंबरला रात्रभर दारूची दुकाने चालू ठेवायची आणि परत पोलिसांनी कारवाई करायची ही सरकारची दुटप्पी भूमिका-
डॉ.प्रतापसिंह पाटील
धाराशिव :(सा. संत गोरोबाकाका समाचार वृत्तसेवा)
शासनाने एका बाजूला दारूबंदी, व्यसनमुक्तीचे धोरण तयार करायचे आणि दुसऱ्या बाजूला २४, २५ व ३१ डिसेंबरला रात्रभर दारूची दुकाने सुरू ठेवायचा निर्णय जाहीर करायचा, हे दुर्दैवी, निषेधार्ह आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राज्य करणाऱ्या सरकारची हीच का शिवनीती आहे, असा सवाल उपस्थित करून राज्य सरकारने ही सोंगे आणि ढोंगे बंद करावी अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, दारूच्या दुकानांना रात्रभर परवानगी देताना पोलिस बांधवांना मात्र रात्रभर बंदोबस्ताला लावून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला लावायची, ही दुटप्पी भूमिका नाही का?शासन नेहमीच महसुलाच्या हव्यासापोटी दारूला प्रतिष्ठा देण्याचे काम करीत आले आहे. महात्मा गांधी यांनी खेड्यांमध्ये समृद्धता आणायची असेल तर नशाबंदी करणे गरजेची आहे असे सांगितले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी अमली पदार्थाविरोधी प्रचार करायला सांगतात. त्यांच्याच विचाराने छत्रपती श्री शिवाजी महाराज,प्रभू श्री राम यांचे हे राज्य आहे म्हणणारे राज्य सरकारने त्यांच्या विचारांना तिलांजली देत नववर्षाच्या स्वागताला दारू दुकाने पहाटे पाचपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
दारू नको, दूध प्या..
आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ३१ डिसेंबरला दारू नको, दूध प्या.. असे उपक्रम राबवीत व्यसनमुक्तीच्या प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. एक जानेवारी हा नववर्ष दिन व्यसनमुक्ती संकल्प दिन म्हणून साजरा करीत असून, शाळा, महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना संकल्प शपथ दिल्या जातात. अशा उपक्रमांना सहकार्य करण्याऐवजी सरकार रात्रभर दारू प्या असा संदेश देऊन काय साध्य करणार आहे ? याचा विचार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी करायला हवा, असे या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.