संतश्रेष्ठ गोरोबा काकांचे तेर व आई तुळजाभवानीचे तुळजापूर तीर्थक्षेत्र जोडणाऱ्या रस्त्यासाठी रु.३३९ कोटी मंजूर - आ.राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला चालना देणारा रस्ता..
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
धाराशिव जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांचे पर्यटन सर्किट निर्माण करून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती व आर्थिक समृद्धी साठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून संतश्रेष्ठ गोरोबा काकांचे तेर व आई तुळजाभवानीचे तुळजापूर तीर्थक्षेत्र जोडणाऱ्या तेर तुळजापूर रस्त्याच्या सुधारणे करिता रु. ३३९ कोटी मंजूर केल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
तेर ला गौरवशाली प्राचीन इतिहास असून येथे संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या समाधी मंदिरासह अनेक प्राचीन मंदिरे, पुराणवस्तू संग्रहालय व राज्य संरक्षित स्मारके आहेत. या स्मारकांच्या जतन व संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत असून एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येत आहे.
तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र विकासाचा रु. १३२८ कोटीचा विकास आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ही दोन्ही तीर्थक्षेत्रे जोडणाऱ्या तेर तुळजापूर रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने भाविक, पर्यटकांसह या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांची मोठी गैरसोय होत होती. या रस्त्याच्या कामामुळे तेर, वानेवाडी, राजुरी, चिखली, म्हाळंगी, आंबेवाडी, केशेगांव, धारूर, मोर्डा, तुळजापूर या गावासह परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे.
या रस्त्याची गरज व महत्व लक्षात घेता किमान १० मी रुंदी व चांगल्या दर्जाचा रस्ता करण्याकरिता आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून हा प्रकल्प घेण्याचे निश्चित करण्यात आले होते, व त्यास हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे या ४२.४० किमी रस्त्याच्या सुधारणेकरिता रु. ३३९.३४ कोटींची मान्यता मिळाली आहे.
जिल्ह्यात धार्मिक पर्यटन सर्किट निर्मितीचा प्रयत्न असून विविध तीर्थक्षेत्रे जोडण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. येथे धार्मिक पर्यटनाला मोठा वाव असून यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे. शक्तीपीठ महामार्गाचे काम देखील याचाच एक भाग असून या रस्त्याचे काम देखील लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.