पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसनशील देशाकडून विकसित राष्ट्राकडे यशस्वी वाटचाल: आ राणाजगजितसिंह पाटील
. पंडित दीनदयाल उपाध्याय ‘महिला रोजगार’ मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद..
२९८ महिलांची प्राथमिक निवड
धाराशिव
(सा.संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, धाराशिव येथे आयोजित केलेल्या या मेळाव्यास विविध कंपन्यामार्फत या महिलांची निवड करण्यात आली.
मेळाव्याचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित होते.आ.राणा जगजित सिंह पाटील बोलताना म्हणाले की, देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात मागील ९ वर्षांमध्ये जागतिक स्तरावर देशाचे नाव मोठे झाले आहे. भारतीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. विकसनशील देशाकडून विकसित राष्ट्राकडे आपली वाटचाल सुरू आहे. समाजातील शेवटचा घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे यासाठी विविध रोजगार निर्मिती योजना व विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून अधिकचे प्रयत्न केले जात आहेत.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून मागील वर्षभरात जवळपास १,५०० युवक, युवतींना व्यवसायांकरिता कर्ज देण्यात आले आहे. विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारासह इतर सहा व्यवसायांना, व्यवसाय वृद्धीसाठी पहिल्या टप्प्यात रुपये १ लाखांपर्यंत अर्थसहाय्य या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते. महिलांसाठीच्या योजनांवर विशेष भर दिला आहे.
घरकुल, उज्वला गॅस, शौचालय, पिण्याचे पाणी याकरिता विविध योजना सुरू केल्या आहेत. महिलांसाठी कृषी ड्रोन प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार सक्षम बनविण्यात येत आहे. महिलांनी रोजगार, स्वयंरोजगारासाठी पूर्ण ताकतीने व हिमतीने पुढाकार घ्यावा. आपण देखील तेवढ्याच ताकतीने यासाठी मदत करू अशी ग्वाही दिली.
तसेच पारधी समाजातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न व या समाजाच्या महिला व युवकांना या रोजगार मेळाव्यात सहभागी केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
या रोजगार मेळाव्यासाठी पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव येथील विविध आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मेळाव्यासाठी २० उद्योजकांनी त्यांच्याकडील जवळपास ३५० पदासांठी मुलाखती घेतल्या. यासाठी ६९० नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी मुलाखती दिल्या व त्यापैकी २९८ महिला उमेदवारांची प्राथमिकरित्या निवड केली. तसेच स्वंयरोजगारासाठी विविध १५ महामंळांकडे ५२६ उमेदवारांनी नोंदणी केली.
याप्रसंगी उमेदच्या जिल्हा अभियान संचालक प्रांजलताई शिंदे, कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त श्री.संजय गुरव, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री.जावळीकर, तहसीलदार श्री.निलेश काकडे, नायब तहसीलदार श्री.संदेश भोसले, उद्योजक श्री.संजय देशमाने, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी, एमसीईडीचे श्री.पांडुरंग मोरे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्री.श्रीहरी सोळंके, श्री.रिजवान कपूर, श्रीमती बोबडे, श्री.समाधान जोगदंड, कार्यक्रम समन्वयक प्रशांत मते उपस्थित होते.