सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात वेळ काढूपणाची भूमिका घेऊ नये- डॉ.प्रतापसिंह पाटील
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
-सध्या राज्य सरकार हे मराठा आरक्षणासंदर्भात वेळ काढू पणाची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर योग्य ठोस भूमिका घ्यावी अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी दिले आहे.
अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा झाल्यानंतर मराठा समाज पेटून उठलेला आहे.मराठा समाजातील अनेक तरुण हे नैराश्यापोटी आत्महत्या करत आहेत त्यामुळे जर भविष्यात अशा गोष्टी टाळावयाचा असतील तर सरकारने वेळ मारुन न नेता मराठा आरक्षणासंदर्भात तात्काळ अध्यादेश काढावा व मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण द्यावे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
सरकार मराठा आरक्षणासंदर्भात तारीख ते तारीख देत आहे मनोज जरांगे पाटील यांना आतापर्यंत दोन वेळा तारखा दिलेल्या आहेत.आता सरकारने दिलेली 24 डिसेंबर ही डेडलाईन तारीख जवळ आलेली असताना सरकार कुठलेही ठोस पावले उचलताना दिसत नाही.उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत बोलताना फेब्रुवारी अखेरपर्यंत आरक्षण देऊ असे म्हटले आहे त्यामुळे मराठा समाजात संभ्रमाची भूमिका निर्माण होत आहे असेही या निवेदनात म्हटले आहे.