>

तेर चे उत्खनन आता जवळून पाहता येणार : आ. राणाजगजीतसिंह पाटील


तेर चे उत्खनन आता जवळून पाहता येणार :

 आमदार राणाजगजितसिंह पाटील 

कोट टेकडीवर उत्खननाची जिवंत

प्रात्यक्षिक प्रयोगशाळा विकसित होणार

धाराशिव, (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा:)

 हजारो वर्षापासून जमिनीच्या पोटात दडलेला वैभवशाली ऐतिहासिक वारसा आता याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे. तेर येथील कोट टेकडीवर उत्खननाची जिवंत प्रात्यक्षिक प्रयोगशाळा विकसित केली जाणार आहे. त्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांतून १३ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे.

इतिहास व पुरातत्व शास्त्राची आवड असणाऱ्या विद्यार्थी, अभ्यासक व पर्यटकांना उत्खनन सुरू असताना थेट पाहता येणार आहे. तेर येथील कोट टेकडीवर पुरातत्त्व खात्याच्या शास्त्र संकेतानुसार उत्खनन, जतन व संवर्धन यासह जिवंत उत्खनन पाहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या कामांसह इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी १३ कोटी ३८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

सदर कामांतर्गत कोट क्षेत्र सभोवताली संरक्षक भिंत बांधणे, शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन करणे, प्राप्त अवशेष प्रदर्शित करणे, स्तर विज्ञान च्या माध्यमातून पर्यटक अभ्यासकांकरिता या परिसरात कशा प्रकारे उत्खनन कार्य केले जातात, प्रत्येक संस्कृतीचे स्थर कशा प्रकारचे विकसित होतात याबाबतची माहिती देखाव्या स्वरूपात पर्यटकांना अभ्यासकांना देणे तसेच परिसरात बाग बगीचा विकसित करणे, पर्यटकांकरिता सोयी सुविधा देणे इत्यादी कामे प्रस्तावित असल्याची माहिती आमदर राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. 

तेर येथे अनेक प्राचीन राज्य संरक्षित स्मारके आहेत. त्यांच्या जतन, दुरुस्ती व संवर्धना करिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेतला जात आहे. तेरणा ट्रस्ट आणि अजिंक्यतारा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून तेर मधील प्राचीन मंदिरे, पुराणवास्तूंचा बृहत आराखडा तयार करण्यात आला होता. निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्या टप्प्याने यातील कामे आता प्राधान्य क्रमानुसार हाती घेतली जात आहेत.

पर्यटन विभागाच्या उपसंचालक डॉ. माया पाटील यांच्यासह १२ तज्ञांच्या पथकाने सन २०१५ मध्ये या टेकडीवर उत्खननास सुरुवात केली होती. येथे पाण्याचा आड, हौद, घराच्या पायऱ्या, नक्षीदार दागिने असे अवशेष उत्खननात सापडले आहेत. त्यासाठीच कोट टेकडी परिसर एक उत्खनणाची कार्यशाळा म्हणून विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी प्रामुख्याने स्तरविज्ञान शास्त्राचा अभ्यास केला जाणार आहे. सुमारे एक एकर क्षेत्रावर टेंसाईल छत टाकला जाणार आहे. संरक्षक भिंत व त्यालागत प्रशस्त उद्यान विकसित करण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाच्या अभ्यासकांसाठी व पर्यटकांसाठी ही साईट एक पर्वणी ठरणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post