आरक्षण मिळाल्याशिवाय मी एक इंच सुद्धा मागे सरकणार नाही:
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील
एक मराठा लाख मराठा घोषणांनी शिवार दुमदुमला..
मुरुड (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) आरक्षण मिळाल्याशिवाय मी एक इंच सुद्धा मागे सरकणार नाही. मी तुमचा मुलगा म्हणून मी शब्द देतो. सरकारने जी मुदत दिली त्या तारखेलाच आपल्याला आरक्षण मिळाले पाहिजे. तेव्हाच आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू येईल असे प्रतिपादन मराठा हृदय सम्राट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुरुडच्या सभेत केले.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्रात सभेचा दुसरा टप्पा सुरू आहे. रविवारी उमरगा येथील सभा करून आज ११ डिसेंबर २०२३ रोजी त्यांची मुरुड तालुका जिल्हा लातूर येथे सभा पार पडली. त्या सभेला जवळपास एक लाख लोकांची उपस्थिती होती. शिवाजी चौक ते नायगाव रोड पर्यंत सर्वत्र मराठा समाज एकवटला होता. तर तेथील सर्वांनी मराठा समाजास पाठिंबा दिलेला होता. मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यासाठी मुरुड व पंचक्रोशीतील सर्वजण सज्ज झाले होते.
तेव्हा मनोज जरांगे पाटील यांचे प्रथम स्वागत करण्यात आले. तेव्हा बोलताना ते पुढे म्हणाले की, माझा लढा हा प्रथम समाजाचा आहे व माझ्या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. हे करत असताना तुम्हाला जर कोणी बदनाम करत असेल तर आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही शांत रहा. आरक्षण मिळाल्यानंतर आपण त्यांचा विचार करू. आज आपण शांततेत आपले म्हणणे शासनाकडे मांडत आहोत. तसेच मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांना ते म्हणाले की तुमचे जे मंत्री बोलत आहेत त्यांना तुम्ही समज द्या. आम्ही शांततेची भाषा करत आहोत आणि ते मात्र भलतेच बोलत आहेत. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज एकजूट होत आहे याबद्दल मला आनंद होत आहे. मराठा समाजाची एकी पाहून काही लोकांच्या पोटदुखी असल्याचेही ते म्हणाले. तसेच आपली एकजूट कायम ठेवा, वज्रमुठ कायम ठेवा ,काही राजकीय लोक आपल्यात गैरसमज पसरवतील, संभ्रम पसरवतील ,तुम्ही शांत रहा. तेव्हाच आपल्याला आरक्षण मिळेल असेही ते म्हणाले. आपले मुले एक टक्का कमी पडले तर घरी रडत येतात. तेव्हा आपली गुणवत्ता असून देखील आपल्याला संधी मिळत नाही. ही संधी आरक्षणाच्या माध्यमातून मिळणार आहे. आपल्या लेकरांच्या चेहऱ्यावर आरक्षण मिळाल्यानंतर जे हसू आहे ते आपल्याला पाहायचे आहे. आपल्या काही लोकांनी आत्महत्या सारखे पाऊल उचलले आहे. ते मराठा आरक्षण नाही मिळाल्यामुळे त्यामुळे आपले ध्येय मराठा आरक्षण आहे व ते आपण मिळवणारच आहोत. आपले हक्काचे आरक्षण दुसऱ्याने घेतले व आज आपल्या लेकराच्या पाठीवर कुणी हात ठेवायला तयार नाही. उलट आपल्याला काही लोक विरोध करत आहेत. मात्र आपण सुद्धा आरक्षण घेतल्याशिवाय मागे सरकणार नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय मी इंच सुद्धा मागे सरकणार नाही काही झालं तरी गावोगावी जाऊन जनजागृती करा, व तुमच्या पाठबळावर मी आहे मी मरायला भीत नाही मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य समाजाला अर्पण केले आहे ,माझ्यासाठी माझा समाज प्रथम व नंतर माझे कुटुंब आहे. मी माझ्या समाजासाठी काही करावे लागले तरी करेन व माझ्या समाजाला आरक्षण देणारच. आज आपल्याला शेती साथ देत नाही नोकरी मिळत नाही त्यामुळे आपला समाज मागे राहिलेला आहे. तेव्हा मी माझ्या समाजासाठी वाहून घेतलेले आहे. माझा परिवारच माझा समाज आहे. तसेच ते शेवटी म्हणाले की माझा जीव जरी गेला तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी इंच मागे सरकणार नाही.
या सभेला लातूर, कळंब, धाराशिव तालुक्यातील मराठा समाज लाखोच्या संख्येने उपस्थित होता. मराठा समाजासाठी मुरुड येथील सर्वांनी एकत्र येऊन सर्व समाज बांधवांची नाश्ता, चहा, जेवण याची व्यवस्था केली होती. व जागोजागी पिण्याच्या पाण्यासाठी सोय केलेली होती. एवढ्या उन्हात एवढी लोक शांततेने बसली होती. तर फार मोठ्या प्रमाणात महिला भगिनी सुद्धा उपस्थित होत्या.