एक रुपया विमा भरून रब्बी पिके संरक्षित करा - आ.राणाजगजितसिंह पाटील
खरीप हंगामा प्रमाणेच रब्बी हंगामात एक रुपया भरून पिक विमा भरण्याचे आवाहन
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून पीके संरक्षित करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत प्रति अर्ज केवळ १ रुपया भरून शेतकऱ्यांनी आपली पीके संरक्षित करून घ्यावीत, असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर तर गहू, हरभरा व कांदा या पीकांसाठी पीक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर आहे.
जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले होते. बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा भरल्याने त्यांना मदत झाली आहे. रब्बी हंगामात पाणी पातळीत दिवसेंदिवस होत असलेली मोठी घट, हवामान बदल, कीड व रोगांचा संभाव्य प्रादुर्भाव यासह नैसर्गिक आपत्तीने रब्बी पिकांच्या उत्पादनात घट आल्यास शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात येतो. महायुती सरकारने शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात विमा संरक्षण दिले असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.
रब्बी हंगामात जिल्ह्यामध्ये १ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पीकांची पेरणी झाली आहे. पीक विमा भरण्यासाठी पीक पेरणीबाबत स्वयं-घोषणापत्र, सात-बारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबुक या कागदपत्राची आवश्यकता आहे. आपले सेवा केंद्र अथवा बँकेमध्ये प्रती अर्ज केवळ १ रुपया विमा हप्ता भरून पीके संरक्षित करता येतात. गव्हासाठी प्रती हेक्टरी रु.४१८००/, ज्वारी (बा) रु.३६३००/- व ज्वारी (जि) रु.३४१००/-, हरभरा पिकाला रु.३८५००/- तर रब्बी कांदा पिकांसाठी प्रती हेक्टरी रु.८८०००/- विमा संरक्षित रक्कम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपली पीके संरक्षित करून घ्यावीत, असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.