>

उमरगा तालुक्यासह इतर ४ तालुक्यातही दुष्काळ जाहीर करा :आ. ज्ञानराज चौगुले


 उमरगा तालुक्यासह इतर ४ तालुक्यातही दुष्काळ जाहीर करावा : आ. ज्ञानराज चौगुले 

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदें यांच्याकडे केली मागणी

धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन उमरगा तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील इतर ४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा. तसेच नारंगवाडी मंडळ अग्रिमसाठी पात्र करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात धाराशिव जिल्ह्यासह राज्यभरात अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने शासनाने राज्यातील सुमारे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील ८ पैकी केवळ ३ तालुक्यांचा समावेश असुन माझ्या मतदारसंघातील उमरगा तालुक्यासह तुळजापूर, भूम, परंडा, कळंब हे ४ तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले आहेत. 

वास्तविक संपुर्ण धाराशिव जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला असुन जिल्ह्यात पावसाचा अनेक दिवस खंड पडल्याने जमिनीतील पाणीपातळीत झालेली घट याचा परिणाम पिकांवर होऊन पिकांचे नुकसान व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सद्यस्थितीत माझ्या मतदारसंघातील उमरगा तालुक्यात एकाही तलावातील पाणीपातळीत वाढ झालेली नाही. आगामी काळातही पाऊस न झाल्यास संपुर्ण रब्बी हंगाम वाया जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान व उन्हाळ्यात नागरिकांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई या संकटांचा सामना करावा लागणार आहे. तसेच उमरगा तालुक्यातील नारंगवाडी मंडळ काही तांत्रिक कारण दाखवून अग्रिम साठी पात्र नसल्याचे विमा कंपनीने आदेश काढला होता. परंतु सदर तांत्रिक बाब दूर करून मा.जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी नारंगवाडी मंडळ पात्र असल्याचे आदेश पारित केला होता. असे असूनही संबंधित विमा कंपनीद्वारे चालढकलपणा केल्याचे दिसून येत आहे. परिणामी सदर मंडळातील शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यामुळे नारंगवाडी (ता.उमरगा) मंडळातील शेतकऱ्यांना अग्रिम साठी पात्र करावे तसेच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यासह तुळजापुर, भूम, परंडा, कळंब या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post