पाच पैकी चार राज्यात भाजप बहुमताने सरकार बनविणार : रामदास कोळगे
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव यांची सडेतोड मुलाखत..
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) पाचपैकी चार राज्यात भारतीय जनता पार्टी बहुमताने सरकार बनविणार. व तेलंगाना मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी चे कार्य चांगले आहे. तेथे सुद्धा आमचे प्रदर्शन चांगले होणार आहे. तेव्हा चार राज्यात भाजप बहुमताने बाजी मारून विरोधकांना सडेतोड उत्तर देईल. अशी माहिती भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी सा. संत गोरोबा काका समाचार या वृत्तपत्राला सडेतोड मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते.
मध्यप्रदेश ,छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोरम, या पाच राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील एक सक्षम नेते तसेच भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ता ते नेते असा प्रवास करणारे रामदासजी कोळगे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते पुढे म्हणाले की ,नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे. तसेच जागतिक स्तरावर देखील मोदींच्या नेतृत्वात धबधबा वाढला आहे. त्यामुळे आपल्या देशात सुद्धा सर्वांनी नरेंद्र मोदींचे नेतृत्व मानलेच पाहिजे. त्याच्या नेतृत्वातच देशाच्या निवडणुका होत आहेत. मध्यप्रदेशचा जर विचार केला तर तेथील दूरदृष्टी नेतृत्व शिवराजसिंह चौहान यांचे नेतृत्वात मध्य प्रदेश मध्ये शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना महत्वपूर्ण ठरली आहे. तसेच त्यांच्या नेतृत्वातही पुन्हा मध्य प्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल. व बहुमता पेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टीला मिळतील. तसेच राजस्थानमध्ये सत्ताबदल अटळ असते. तेव्हा राजस्थान मधील काँग्रेसचे सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले असून केंद्राच्या योजना वर ते सरकार अवलंबून आहे. केंद्र सरकारच्या पिक विमा योजना, शेतकरी सन्मान योजना, वर शेतकरी खुश असून तेथे आता भारतीय जनता पार्टी दीडशेपेक्षा अधिक जागा घेऊन सत्तेवर येईल.
तसेच ते पुढे म्हणाले की छत्तीसगडचा विचार केला तर रमण सिंह मुख्यमंत्री होते तेव्हा तेथील धान पिकाला त्यांनी बोनस दिला होता. मात्र तो बोनस काँग्रेस सरकार देऊ शकले नाही. हा म्हणजे जेवढे बोनस भाजप सरकार ने शेतकऱ्यांना धान पिकाला दिले तेवढे ते देऊ शकले नाहीत. तेव्हा तेथे पुन्हा रमणसिंगच मुख्यमंत्री होतील असेही ते म्हणाले. तसेच मिझोरम मध्ये मित्र पक्षाला घेऊन आम्ही सरकार बनवणार आहोत. तर तेलंगणाचा विचार केला तर तेथे जे सरकार म्हणते की आम्ही घरकुल देतो मात्र त्या घरकुलामध्ये केंद्र शासन पैसा देते. त्याचा मात्र तेलंगणातील सत्ताधारी विचार करत नाहीत. तेव्हा तेलंगाना मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी चांगले प्रदर्शन करील. तेथील जनतेने साथ दिली तर आम्ही तिथे सरकार सुद्धा बनवू. असेही ते म्हणाले.