>

मानव निर्मित स्वर्ग : दुबई


 प्रति,

संपादक


       मानव निर्मित स्वर्ग..दुबई 

दुबई देशाची महत्त्वपूर्ण माहिती सांगणारा महत्त्वपूर्ण लेख 

        अनेक आपत्ती आणि विपरीत नैसर्गिक परिस्थिती असून ही जमिनीवरील मानव निर्मित स्वर्ग म्हणता येईल असे शहर म्हणजे दुबई. दुबई ते मुंबई अंतर अंदाजे दोन ते अडीच हजार किलोमीटर आहे. विमानाने अडीच ते तीन तासात दुबई पोहोचता येतं. भारतातून अनेक शहरातून दुबई साठी अनेक कंपन्यांची विमाने ये जा करत असतात. अतिशय सुंदर, भव्य आणि शिस्तबद्धता असलेलं जीवनमान येथे पाहायला मिळते. ऑक्टोबर ते डिसेंबर दोन महिने दुबईत वास्तव्यास होतो. वर्षाचा हा काळ म्हणजे हळूहळू कडक उन्हाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागते. येथे नवीन आलेल्यांसाठी हा काळ सुसह्य असतो. आबुदाबी, दुबई, शारजाह, अजमान, रास अल खैमाह, उम अल कुवैन, फुजैराह या सात छोट्या लोकसंख्या असलेल्या राज्यांचा मिळून युनायटेड अरब अमिरात हा समृद्ध असा देश आहे. दुबई आपल्या मुंबई पेक्षा खुप कमी ३३ लाख लोकसंख्या असलेले युनायटेड अरब अमिरात(यू ए ई) मधील एक स्वतंत्र राज्य आहे. राजेशाही असल्याने शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचा एकछत्री अंमल आहे. यांच्या नेतृत्वात दुबईची जगात आपली वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. जगभर प्रवासाची हौस असणाऱ्या मंडळींना दुबईचे आकर्षण असतेच. प्रदूषण मुक्त वातावरण, स्वच्छ आणि प्रशस्त बहुपदरी पोटातील पाणीही हालत नाही असे गोलाकार नागमोडी रस्ते, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार १६३ मजले असलेली जगातील सर्वात जास्त उंच इमारत बुर्ज खलिफा सह ऊंचच्या ऊंच आणि वास्तुकलेचा नमुना असलेल्या सुंदर इमारती, उन्हाळा जास्त कडक असल्याने घरे, दुकाने,हॉटेल्स,शॉपिंग मॉल,गाड्या, शाळा, दवाखाने सर्व ठिकाणी एअर कंडीशनर सुरू असतात. ऊंच इमारतींमध्ये जास्तीत जास्त काचेचा वापर पाहायला मिळतो. माणसांपेक्षा जास्त वाहने दिसतात पण रस्त्यांवर वाहतूक थांबून राहत नाही. वेगाने वाहने जात असतात. जागोजागी वेग मर्यादा दाखवणारे बोर्ड आणि शहरभर कॅमेरे लावलेले आहेत. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन होतांना दिसते. पायी चालणाऱ्या व रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तींना प्राथमिकता दिली जाते. पोलिस स्टेशन आहेत पण चौकाचौकात कुठेही पोलिस दिसत नाहीत. प्रत्येक नागरिक नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. कॅमेरे नजर ठेवून असतात. वेगात असलेली वाहने जाऊ दिली जातात त्यासाठी इतर वाहने स्वतःहून थांबतात. चोरी सारखे गुन्हे होत नाहीत. एखाद्याची एखादी वस्तू कुठे राहिली तर ती तिथेच राहील कोणी घेऊन जात नाही. पार्किंग शिवाय इतर कुठे ही वाहन पार्क करण्याची सोय नाही. कायदे अतिशय कडक आणि मोठे आर्थिक दंड असल्याने सहसा चुका होत नाहीत. सकाळ संध्याकाळी पाळीव प्राणी फिरवत असताना काळजी घ्यावी लागते. घाण झाली असल्यास मलकानेच स्वच्छ्ता करायची असते.

     शहरात जगातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल दुबई मॉल, मॉल ऑफ एमिरेट्स, सिलिकॉन सेंट्रल मॉल,ड्रॅगन मार्ट, आऊटलेट मॉल,आय बी एन बतुटा मॉल असे अनेक मोठमोठे शॉपिंग मॉल्स आहेत. देश विदेशातील खाण्यापासून वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध होतात. ग्लोबल विलेज, मिरॅकल गार्डन, डेझर्ट सफारी, दुबई फ्रेम, बुर्ज खलिफा, मुजियम ऑफ द फ्युचर, पाम झुमेरा, दुबई ॲक्किरियम अंडर वॉटर झु, धोव क्रुझ राईड, काईट बीच,अशा असंख्य प्रेक्षणीय स्थळांसह संपूर्ण दुबई प्रेक्षणीय आहे. मुस्लिम राष्ट्र असल्याने साहजिकच येथील प्रार्थना स्थळ स्वच्छ सुंदर मशिदी आहेत तसेच इतर धर्मियांची मंदिरे, चर्च, गुरुद्वारा ही आहेत. आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्यास बंदी नाही. स्वधर्माबाबत आदर आहे तसा इतर धर्मांचाही आदर राखला जातो.

        मुंबई सारखी नाईट लाईफ येथे ही आहे. रात्रभर विजेच्या प्रकाशाचा झगमगाट असतो. विविध हॉटेल्स मध्ये खवैयांची गर्दी असते. जिकडे तिकडे विकासाची कामे सुरू दिसतात. वाहतुकीसाठी बहुतेकांकडे स्वतःची वाहने आहेत. याशिवाय शहर वाहतूक बसेस, डब्बलडेकर आणि मेट्रो रेल यांची वारंवारीता खूप चांगली आहे. गाड्यांचे हॉर्न कधी ऐकायला येत नाहीत. अपरिचित व्यक्ती असला आणि नजरानजर झाली तर प्रसन्न हास्य केलं जातं. थँक यू आणि सॉरी सहजपणे बोलले जाते. येथील स्थानिक पुरुष कंदुरा परिधान करतात तर स्रियांनी काळा बुरखा परिधान केलेला असतो. नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरची मंडळी आपल्या पद्धतीप्रमाणे पोशाख परिधान करतात. वाळवंटी प्रदेश असल्याने पावसाचे अत्यल्प प्रमाण असते. समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्यासाठी उपयोगात आणले जाते. सांडपाण्यावर प्रक्रिया  करून ते पाणी झाडांना आणि बागबगीच्यांना वापरले जाते. दुबई मध्ये फिरताना भाषेची अडचण येत नाही. अरेबिक,इंग्रजी च्या बरोबरीने हिंदी मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. नोकरीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भारतीय इथे स्थायिक झाले आहेत. वेगवेगळ्या उत्सवांच्या निमित्ताने ते एकत्र ही येतात तसेच प्रसंगी एकमेकाकडे जाणे येणे ही असतेच. त्यामुळे इंग्रजी बरोबर हिंदी ही बोलली जाते. भारतीय तसेच इतर देशांच्या शाळा ही येथे आहेत. उच्च शिक्षणासाठी विविध देशांची विद्यापीठे ही आहेत.

      वाळवंटी प्रदेश असल्याने पूर्वी काटेरी झुडपे असायची आता मोठी झाडे लावली जात आहेत. हिरवळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उन्हाळ्यात येथील तापमान ५०  डिग्री सेल्सियस च्या ही पुढे असते त्यामुळे झाडे जगवायचे काम जिकिरीचे आहे. पाऊस नसल्याने कृत्रिम पावसाचे प्रयोग राबविले जातात.

      असे हे दुबई,,,,अवघड जीवनमान असले तरी इथल्या नेतृत्वाने आणि येथील जनतेने मोठ्या कष्टाने स्वर्ग निर्माण केला आहे. दुबई जमिनीवरील मानव निर्मित स्वर्ग आहे.


लेखक,

प्रा. संजय पवार(पुणे)

सध्या,,

दुबई सिलिकॉन ओयासिस,

दुबई.

१८ नोव्हेंबर २०२३

Post a Comment

Previous Post Next Post