संतश्रेष्ठ श्री गोरोबाकाका मंदिर व परिसर विकासासाठी १३ कोटी - आ. राणाजगजितसिंह पाटील
तेर (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
संतश्रेष्ठ श्री गोरोबाकाका देवस्थान एक उत्तम धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेतला जात असून प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत दिवाळीच्या पूर्वसंध्येला आणखीन रुपये ४ कोटी निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. यासाठी आजवर नव्याने एकूण रु १३ कोटी निधी उपलब्ध झाला असून या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी दिली आहे.
तेरला मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा असून येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागासह जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. संतश्रेष्ठ गोरोबा काका मंदिर व परिसराचा संपूर्ण विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. उपलब्ध निधी मधून पहिल्या टप्प्यात महाद्वार, नगारखाना, संरक्षक भिंत, शौचालय, दर्शनबारी, भक्त निवासाचे उर्वरित काम, छोट्या व्यावसायिकांसाठी दुकाने, विद्युतीकरण ही कामे करण्यात येणार आहेत.
मंदिर अराखड्याबाबत आज ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीला अधिक्षक अभियंता सा. बा. विभाग, कार्यकारी अभियंता सा. बा. विभाग, कार्यकारी अभियंता जि. प. Archeology यांच्यासह वास्तुविशारद नागेशकर व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. सदरील बैठकीमध्ये उपलब्ध निधी मधून कोणती कामे हाती घ्यायची याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे विकसित करून पर्यटन सर्किट च्या माध्यमातून रोजगार निर्मितीसह आर्थिक समृद्धीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून जिल्ह्याच्या अर्थकारणाला यामुळे नक्कीच कलाटणी मिळणार आहे.