*
*कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदीसाठी जिल्ह्यात विशेष ग्रामसभा*
जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे
*धाराशिव(सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा):* जिल्ह्यात कुणबी - मराठा नोंदीचे पुरावे शोधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.त्यापैकी सर्वात जास्त नोंदी धाराशिव तालुक्यातील कारी या गावी आढळून आल्या आहेत. त्यांची संख्या ११० आहे. त्यामुळे याठिकाणी आज विशेष शिबीराचे आयोजन करुन प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. यावेळी कल्याण पाटील, उमेश सारंग, पद्माकर करळे, अतुल डोके आणि सचिन पाटील यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
विशेष शिबीराच्या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक श्री.दराडे,कारी गावच्या सरपंच निलम कदम,उपसरपंच खाशेराव विधाते,तलाठी मनोज राऊत,पोलिस पाटील अमृता माळी, महा-ई सेवा केंद्राचे परिक्षित विधाते आणि कैलास थोरात आदी उपस्थित होते.
डॉ.ओम्बासे बोलताना पुढे म्हणाले की, या शिबीराच्या ठिकाणी आज कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तेंव्हा गावातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या विशेष शिबीराचा लाभ घ्यावा.जिल्ह्यातील आजपर्यत एकूण ७७ गावात १२१५ कुणबी नोंदी असलेल्या आढळून आल्या आहेत.त्यामुळे सदर गावांत कुणबी प्रमाणपत्र संबंधी विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन सभेत कुणबी नोंदीचे वाचन केले जाणार. बऱ्याच नोंदीमध्ये काहींच्या आडनावाची नोंद आढळून आलेली नाही.त्यामुळे या सभेत गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सर्व प्रकारचे सहकार्य करावे.जेणेकरुन कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया सुलभ होईल. तसेच ज्यांच्या नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तात्काळ करण्यात येणार असल्याचेही यावेळी डॉ.ओम्बासे यांनी सांगितले.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी कारी गावातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.तसेच या कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना धाराशिवचे तहसीलदार डॉ. बिडवे म्हणाले की,कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वाटप मराठवाड्यात सर्वप्रथम कारी गावातील सुमीत माने यांना देण्यात आले.प्रत्येक गावात शिबीराचे आयोजन करण्याचा मानस जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांचा असल्याचा देखील श्री.बिडवे म्हणाले.
या कार्यक्रम प्रसंगी कारी गावांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
*****