सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये -डॉ.प्रतापसिंह पाटील
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे आरक्षण
देण्याची निवेदनाद्वारे केली मागणी
धाराशिव-(सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक स्थितीवर आहे त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता लवकरात लवकर मराठा आरक्षणा संदर्भात निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ना.अजित दादा पवार यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,गेल्या दोन महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षण मिळावे याकरिता मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.याकरिता मराठा समाजाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर दौरे देखील केले या दौऱ्याला मिळालेला प्रतिसाद पाहता मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सातत्याने मराठा समाज हा शांततेच्या मार्गाने शासनाकडे आरक्षणाची मागणी करत आहे मात्र या आरक्षणाला आजपर्यंत मुर्तरूप आलेले नाही तरी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देऊन या समाजाला न्याय द्यावा.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून लवकरात लवकर आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा असेही या निवेदनात डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी म्हटले आहे.