>

प्रत्येक दिव्यांगाला लाभ देणे हा अभियानाचा मुख्य उद्देश: आ.बच्चू कडू



  *प्रत्येक दिव्यांगाला आवश्यक असलेला लाभ देणे हाच अभियानाचा मुख्य उद्देश :आमदार बच्चू कडू

                  

धाराशिव येथे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान

 दिव्यांग बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

युडीआयडी कार्ड व प्रमाणपत्रांचे वाटप


धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

दिव्यांग बांधवांचे प्रशन सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे सेवा देण्याच्या हेतूने 

" दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी " हे अभियान राबविले जात आहे. या अभियानादरम्यान माझ्यासोबत तज्ज्ञांची एक चमू आहे.दिव्यांगाच्या अर्ज,तक्रारी आणि प्रत्येक कागदाची जबाबदारीने दखल घेतली जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाला आवश्यक लाभ देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

            आज 21 सप्टेंबर रोजी धाराशिव येथे दिव्यांग कल्याण विभागांतर्गत " दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी " या अभियानानिमित्त आयोजित मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,सहायक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, लातूर येथील समाज कल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त  अविनाश देवसटवार,जिल्हा समाज कल्याण अधिकारी सूर्यकांत भुजबळ,सहायक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब अरवत,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास, मयूर काकडे,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता भार्त कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

           आमदार श्री कडू बोलताना पुढे म्हणाले,दिव्यांगांसाठी युडीआयडी ओळखपत्र,रेशनकार्ड,घरकुल मिळवून देण्यात येत आहेत. दिव्यांगांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे सांगून ते पुढे म्हणाले, दिव्यांगांच्या बचतगटांना उद्योग, शाळा,सहकारी संस्थांच्या माध्यमातून दिव्यांगांचा विकास साधत हा विभाग अधिक गतिशील बनवण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे.असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

           आमदार श्री.कडू पुढे म्हणाले, प्रशासकीय अधिका-यांनी दिव्यांगांसोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत. दिव्यांगांचा विवाह,खेळाला प्रोत्साहन, कौशल्य विकाससारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबरच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करावेत.असेही ते यावेळी म्हणाले.

              जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे प्रास्ताविक करतांना म्हणाले, दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून दिव्यांगांच्या कल्याणासाठी हा स्वतंत्र विभाग सुरु झाला आहे. शासन आपल्या दारी अभियानाच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात    

 "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी " हे अभियान राबवण्यात येत आहे.या विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांचे प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.जिल्ह्यात  21 हजार दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त करून घेण्यात आलेत.यापैकी 5 हजार घरकूल अर्जदार आहेत.तसेच संजय गांधी निराधार योजना आणि अंत्योदय योजनेसाठी 8 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.या सर्व अर्जांवर लवकरच कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यात 1100 दिव्यांगांना युडीआयडी कार्डचे नुकतेच वितरण करण्यात आले आहे.दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर सर्व विभागांचे अधिकारी व सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

              कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते 25 दिव्यांग लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दिव्यांग स्वयंरोजगारसाठी बीज भांडवल अनुदान योजनेचा लाभ,आवास योजना,संजय गांधी निराधार अनुदान योजना,आयुष्यमान भारत स्वास्थ्य योजना,रेशन कार्ड,ब्रेल किट,व्हील चेअर,युडीआयडी कार्ड आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी छायादिप मंगल कार्यालय येथे सकाळी 10 वाजतापासून सुरु झालेल्या या शिबिरात नोंदणीसाठी दिव्यांगांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तूंच्या स्टॉल्सला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबीरासाठी उपस्थित असलेल्या दिव्यांगांसाठी व्हिल चेअर,पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post